हे दुःख पाहवत नाही......



corna



कोरोनाकाळात कोलमडलेलं समाजजीवन सावरण्यासाठी पुढील काळात माणूसकी जागवणं हेच प्रत्येकासमोरचं आव्हान आहे. छोट्यातला छोटा माणूस ते मोठ्यातला मोठा उद्योजक कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोना हे जरी निमित्त असलं तरी वारंवार होणारे बंद आणि चुकीच्या पद्धतीने लादलं गेलेलं लाॅकडाऊनही याला कारणीभूत आहे. सुरूवातीच्या काळात ह्या कोरोनाची एवढी भयानक दहशत होती की पहिल्याच झटक्यात हजारो लोक शहरं सोडून गावाकडे भरकटले. यामध्ये अनेकांच्या नौकऱ्या गेल्या. बरेचशे लोक बेघर झाले. कारण दहा-वीस वर्षापूर्वी सोडलेली गावं आणि गावातलं सगळं विकून शहरात गेलेली ही माणसं जेव्हा गावात परतली तेव्हा गावात पाय ठेवायला जागा मिळाली नाही. किमान अठ्ठावीस दिवस चावढी, शाळा खोल्यांमध्ये आसरा घेतला. काही दिवस कसेबसे गावात काढले. पुन्हा कामाच्या आशेनं जेव्हा ही माणसं शहरात परतली तेव्हा नौकऱ्या गेल्या होत्या. रहायचं कुठं आणि खायचं काय? हा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला. स्थलांतरीतांचे तर बेहाल झालेच पण शहरातील छोट-छोट्या व्यवसायिकांचेही बेहाल सुरू झाले. आजही सर्वजन दुष्परिणाम भोगत आहेत. मोठ-मोठ्या व्यापारी, व्यावसायिकांनी तर आपलं दु:ख कोणाला सांगायचं? हे सगळं कमी म्हणून की काय याच काळात गॅस, पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला. जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगणाला भिडले. यामध्ये सामान्य माणूस अक्षरशः होरपळून निघत आहे. ज्यांची हातावरची पोटं आहेत त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. ज्यांचा आवाज पोहोचू शकतो ते मूग गिळून शांत आहेत. त्यातच पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा मथळ्याखाली येणाऱ्या बातम्या हादरवून सोडत आहेत. २०२० च्या मार्चच्या प्रारंभी भारतात आलेलं हे कोरोनाचं भूत फक्त महाराष्ट्राच्याच मानगुटीवर बसलं आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यात कोरोनाने सुट दिलीय असं चित्र दिसत आहे. तो फक्त महाराष्ट्रातच थयथयाट करतोय हे न उलगडणारं कोडं अधिक संभ्रम निर्माण करतंय. खरं तर कोरोनाकाळ हा भयंकर काळ आहे. अशा भयंकर काळात गरजुंसाठी मदतीचे अनेक हातही पुढे येताना दिसले. पण त्याचवेळी एक परिस्थिती तर अशी निर्माण झाली होती की, खाजगी हाॅस्पिटलचे बेड फक्त श्रीमंतानाच मिळाले. गरिब मात्र सरकारी रुग्णालयातसुद्धा बेदखल आहेत. कोरोनाकाळात समाजाचं खरं रूप पुढं आलं. गरिब-श्रीमंत दरी पहायला मिळाली. सामान्यांना दुजाभावाची वागणूक मिळाली. जागोजागी विषमता पहायला मिळाली. अनेकांचे आर्थिक, सामाजिक शोषण झाले. कोरोनाकाळात समाजासमोर ऊभे राहिलेले प्रश्न गंभीर आहेत. ह्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे माणसाकडे नाहीत. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे काळ देईलच. आज दररोज मुर्दाबाद होणारी माणूसकी आणि त्यातून हरवत जाणारा माणूस पण आपल्याला भयंकराच्या दिशेने घेऊन जात आहे. कोरोनामुळे माणूस माणसात राहिला नाही याची अनेक उदाहरणे सांगता येतील. प्रत्येकाचा कोंढलेला श्वास आणि त्यातून होणारी घुसमट मानवी जीवनात ताणतणाव निर्माण करीत आहे. त्यामुळे सामाजिक आव्हानं निर्माण होत आहेत. ही समस्या सोडवणे तर सोडाच पण ही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्येदेखील आमच्या व्यवस्थेकडे नसावं ही शोकांतिकाच वाटते. प्रत्येक गोष्टीवर लाॅकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. लाॅकडाऊनमुळे आजचे मरण उद्यावर नेतोय एवढंच आम्ही करतोय. ह्या संकटावर कायमची मात करायची असेल तर खूप व्यापक स्वरूपात उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोनाला आपण गंभीरपणे घेऊ शकलो नाही आणि यातून कोणताच धडा घेतला नाही तर दर पाच वर्षांने असे संकट ऊभे राहू शकते. कोरोना हे जरी नैसर्गिक संकट वाटत असले तरी हे नैसर्गिक संकट नाही. माणसाच्या अति हव्यासातून आणि अति महत्त्वाकांक्षेतून उरावर बसलेलं हे भूत आहे. हे उरावर बसलेलं कोरोणाचं भूत उतरविण्यासाठी निसर्गाने घालून दिलेले नियम आम्हाला पाळावेच लागतील. निसर्गाचे नियम पाळले तर माणसाला जगण्यासाठी कुठलेच नियम बनवण्याची आवश्यकता भासणार नाही. जेव्हा चीनच्या वुहानमधून कोरोनाचे वारे इटली, अमेरिका, रशिया अशा राष्ट्रात धडकले तेव्हा तर वाटले होते की, आता मानवी वस्तीचा अंत अटळ आहे. जगभरात थैमान घातलेला कोरोना २०२०च्या अखेर थोडा ढिला झाला होता. पण लगेच दिड-दोन महिन्याने तो पुन्हा सक्रिय झाला. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक आहे. अशा मथळ्याखाली आलेल्या बातम्यांनी अनेकांचे कंबरडे मोडले. त्यातल्या त्यात भारतात ही दुसरी लाट फक्त महाराष्ट्रात जास्त दिसत आहे. हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेनं हे आव्हान पुन्हा एकदा स्विकारलं आहे. लवकरच ही दुसरी लाटदेखील निघून जाईल. पुन्हा पूर्वीचे दिवस येतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. तोपर्यंत माणसाकडे माणूस म्हणून पाहूया. अशा भीषण संकटप्रसंगी कोरोनाच्या नावाखाली कोणाची अडवणूक होणार नाही याची काळजी घेऊया. कोरोनाकाळात अनेक वस्तूंचे भाव दुप्पट, तिप्पट झाले पण शेतकऱ्याचा भाजीपाला, त्याने पिकवलेले अन्नधान्ये यांचे भाव मात्र आहे तिथेच आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्यांची किती ससेहोलपट होते हे आपण पाहिलं. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकांना सुविधा मिळत नाही आणि समाजातील काही संधीसाधूंमुळे समाज होरपळून निघतो. समाजाचे होणारे हाल कोणताही संवेदनशिल माणूस पाहू शकत नाही. 'न देखवे डोळा ऐसा हा आकांत। परपीडे चित्त दुःखी होते॥' हे संत तुकारामांचे वचन आज प्रकर्षाने अनुभवायला मिळत आहे. दुष्काळात अन्न-अन्न करत लोक मरू नयेत म्हणून स्वतःच्या घरातील अन्नधान्याचे कोठार रिकामे करून इतरांच्या मुखात अन्न भरवणारे संत तुकाराम आज आठवतात. महाराष्ट्राला या थोर संतांच्या महान विचारांची परंपरा आहे. या परंपरेचे पाईक या नात्याने माणूसकी जागवण्याची आवश्यकता आहे.
मनाला पटत नाही पण सध्या आपण एकाचवेळी दोन भूमिका पार पाडतोय. काही क्षणांपूर्वी आपण कोणाला तरी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय तर पुढच्याच काही क्षणात कोणालातरी भरभरुन शुभेच्छा देतोय. हे आपण काय करतोय? आपण असं का वागतोय? जाणीवपूर्वक तर अजिबात नाही. मग आपण असं का वागतोय? नेमकं माणसाच्या मनात आहे तरी काय? आपल्याला काहीच कळत नाही की आपल्याला वेड लागलंय? आपण खूप घाबरलोय की आपण भावनांना वाट मोकळू करुन देतोय? असे असंख्य प्रश्न आज मनात निर्माण झालेत.
कोरोना नावाचा आजार जगभर पसरला आणि सगळं जग सैरभैर झालं. सुरुवातीला फार काही गंभीर वाटलं नाही पण जसजसं इटली, अमेरिका असे देश परेशान झाले तेव्हा मात्र या आजाराची भयानकता लक्षात आलीच होती. पहिल्या लाटेत भारत बऱ्यापैकी तरला. पहिली लाट चाटून गेली. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने एवढा जबरदस्त तडाखा दिलाय. पळता भूई थोडी झालीय. माणूस माणसांत राहिला नाही हे सध्याचे चित्र आहे. माणूस नेहमीच आशेवर जगत आलाय. स्वप्न पाहण्याचं वरदान त्याला लाभलंय. आज ना उद्या कोरोना जाईन. सगळं पूर्वपदावर येईल. या भाबड्या आशेवर तो जगतोय. उद्या काहीतरी चांगलं होईल ही आशा असली तरी आजचा वर्तमान मात्र कठीण आहे. कोरोना महामारीने माणूस पूर्ण कोसळला आहे. या परिस्थितीचा सामना करणे अधिकच कठीण बनले आहे. कोरोना हे संकट जरी वरवर अस्मानी वाटत असलं तरी त्याला सुलतानीची किनार लाभली आहे. माणूस अस्मानीशी दोन हात करु शकतो पण सुलतानीशी नाही. जनता सैरभैर झालेली असताना ही परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य असणाऱ्यांनी विवेक जागवण्याची ही वेळ आहे. आता 'भावपूर्ण श्रद्धांजली' लिहायला खरंच अवघड वाटतंय. दिवसातून कितीवेळा श्रद्धांजली वहायची. एखादी व्यक्ती अपघाताने अथवा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू पावली तर ठीक आहे. परंतू व्यवस्थेमुळे पूर्वनियोजित मृत्यूचा जर आपण भाग बनत असु तर ते दुर्दैव आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत रोजगार उपलब्ध .........

𝗪𝗼𝗿𝗸: 𝐓𝐨𝐭𝐚𝐥𝐥𝐲 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐖𝐨𝐫k

विक्रीसाठीछोटा हत्ती आणि बोलेरो प्लस